रामनवमीच्या निमित्ताने आज सर्वत्र उत्सव साजरा केला जात आहे. राम जन्मभूमी अयोध्या देखील वेगळ्याच रंगात पाहायला मिळत आहे. रामनवमी हा सण भगवान श्री रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते. अयोध्यामध्ये देखील आज राम जन्म मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.
आज अयोध्येतील राम मंदिर फुलांनी सजवण्यात आले आहे. आज सकाळपासूनच देश-विदेशातील भाविक अयोध्येमध्ये येताना दिसत आहेत. श्री रामाच्या दर्शनासाठी भाविक अयोध्येत मोठ्या प्रमाणात जमले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज अयोध्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांसह एसडीआरएफ आणि एनडीआरएफ देखील तैनात करण्यात आले आहेत.
राम मंदिरात दर्शन आणि पूजेचा कालावधी सुरू झाला असून, मंदिराच्या बाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी सहा वाजता राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले, आज संध्याकाळपर्यंत अयोध्या रामजन्मोत्सवाच्या आनंदात तल्लीन राहणार आहे. सकाळी 9.30 पासून राम मंदिरात धार्मिक विधीनूसार पूजा सुरु झाली आहे. यावेळी रामललाच्या कपाळावर सूर्यकिरणांचा टिळक लावला गेला. रामललाच्या मस्तकावर सूर्याभिषेक झाल्यानंतर प्रसाद अर्पण करण्यात आला.
एवढेच नाही तर संध्याकाळी अयोध्येतील सरयूच्या घाटावर दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे. रामजन्मोत्सवानिमित्त दीड लाखाहून अधिक दिवे याठिकाणी लावण्यात येणार आहेत.
दरम्यान, आज राममंदिरात आरतीनंतर भव्य आणि दिव्य यज्ञविधी देखील केला जाणार आहे. नंतर वाल्मिकी रामायण व रामचरितमानसाचे पारायण होईल. त्यानंतर भाविकांना जेवण दिले जाईल. असे मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितले आहे.