आज पंतप्रधान नरेंद्र मोदी रामेश्वरमच्या दौऱ्यावर आहेत. रामनवमी निमित्ताने पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूला मोठी भेट दिली आहे. आजच्या या खास दिवशी पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथील पंबन पुलाचे उद्घाटन केले आहे. पीएम मोदी यांनी 2019 मध्ये या पुलाच्या पुनर्विकास योजनेचे भूमीपूजन केले होते.
समुद्रावर बांधलेला हा देशातील पहिला व्हर्टिकल सी ब्रिज आहे. या पुलाच्या माध्यमातून सागरी वाहतुकीत सुधारणा होऊन लोकांना प्रवास करणे सोपे होणार आहे.
या नवीन पंबन पुलाच्या बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा व्हर्टिकल लिफ्ट तंत्रज्ञानावर आधारित असून, मोठी जहाजे समुद्रातून जात असताना हा पूल वरती करता येतो. या पुलामुळे तामिळनाडूमधला प्रवास सोपा होईलच, पण व्यावसायिक क्रियाकलापांनाही चालना मिळू शकेल
या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींनी रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) या नवीन रेल्वे सेवेचे उद्घाटनही केले. या रेल्वे सेवेमुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपे होणार असून वेळेचीही बचत होणार आहे. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर हे दोन्ही प्रकल्प पंतप्रधान मोदींनी तमिलनाडूला भेट दिले आहेत.
या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘हा पूल आणि रेल्वे सेवा केवळ तामिळनाडूसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी विकासाचे नवीन मार्ग उघडणार आहे. या प्रकल्पांमुळे संपूर्ण प्रदेशात पर्यटन आणि व्यापार या दोन्हींना चालना मिळेल आणि स्थानिक लोकांनाही त्याचा फायदा होईल.
नवीन पंबन पूल आणि नवीन रेल्वे सेवा हे प्रकल्प भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विकास कामाचा भाग आहेत. यावरून देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे कसे काम करत आहेत हे दिसून येते. असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले आहेत.
यावेळी पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाच्या या प्रवासात प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलावे, असे आवाहनही केले आहे.
पंबन ब्रिज साल 1914 मध्ये बांधण्यात आला होता. पण पुलाच्या दुर्व्यवस्थेमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पुलाचे पुनर्वसन करण्यात आले. आता पूल नवीन तंत्रज्ञाने सुसज्ज असून, प्रवास अगदी सोपा झाला आहे. 1914 पासून आतापर्यंत हा ब्रिज रामेश्वरम बेट आणि मुख्य भारत बेटातील महत्वाचा दुवा आहे.