Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर व्यापारी कर लादल्याने अनेक कंपन्यांच्या उत्पादनांवर आणि त्यांच्या किमतीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. परिणामी अनेक देशातील शेअर बाजारात गेल्या आठवड्याभरापासून घसरण पाहायला मिळत आहे. ४ एप्रिल रोजी झालेली शेअर बाजारातील घसरण सर्वात मोठ्या घसरणींपैकी एक मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील एक पोस्ट केली आहे आणि ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्रूथ या सोशल मीडियावर गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “अमेरिकेत येणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांनो, मी माझ्या धोरणांमध्ये कधीही बदल करणार नाही. श्रीमंत होण्याची, पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत होण्याची ही उत्तम वेळ आहे”. जागतिक आर्थिक मंदी येण्याची परिस्थीती निर्माण झाली असतानाच ट्रम्प यांनी अशी पोस्ट करत अनेकांना बुचकळ्यात पाडले आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणानुसार भारतातील कापड, वाहने आणि रत्ने यांसारख्या उद्योगांवर परिणाम होऊ शकतो. कारण आता भारतात तयार होणाऱ्या वस्तू अमेरीकेत निर्यात करणे अधिक खर्चिक होईल त्यामुळे भारतीय वस्तू अमेरीकेत महाग होतील त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी कमी होऊ शकते. त्यामुळे निर्यातीत घट झाल्यास भारताच्या आर्थिक वाढीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणजे अनिश्चित व्यापार धोरणांमुळे जगातील विविध कंपन्या भारतात गुंतवणूक करण्याबाबत सावध भूमिका घेऊ शकतात, ज्यामुळे थेट विदेशी गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.
एकंदरित ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा भारतावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु असं असलं तरी भारताला अमेरिकेशी व्यापार संबंध टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. कारण अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे भारत सरकारने व्यापारी समजूतीनं यावरती काही तोडगा निघतो का?, यावरती भर देण्याची गरज आहे,असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत