Narayan Rane: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली, विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे. देश आणि राज्यात लोककल्याणाचा कारभार सुरू आहे, त्यामुळे आता विरोधकांकडे दुसरे काम राहिले नाही,असे म्हणत माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला आहे. आज राणेंनी (दि.६ एप्रिल) सहकुटुंब शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींनी उद्धव ठाकरेंवरती प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की, “चांगल्या दिवशी नको त्या माणसाचे नाव घेत आहात. विकास , समृद्धी , लोकहीत हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणे आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणे, हे उद्धव ठाकरेंचे काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढच्या निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक , सामाजिक , विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी 39 वर्ष त्यांच्या सोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली’, असे देखील राणे म्हणाले आहेत.
यावेळी राणेंनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला. “संजय राऊत हे दुकान चालवतात. सकाळी उठून मीडियाला बोलावले जाते. त्यांचे कतृत्व सांगा, देश, राज्य आणि गावासाठी त्यांचे योगदान सांगा. तुम्ही त्यांच्या बातम्या देवू नये अस मला वाटते. अशा माणसावर बोलून मी वेळ वाया घालवत नाही”, असे राणे राऊतांबद्दल बोलताना म्हणाले.
कर्जमाफीच्या पैशांमधून शेतकरी लग्न, साखरपुडे करतात असे वक्तव्ये माणिकराव कोकाटे(Manikrao Kokate) यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. कोकाटेंच्या या वक्तव्यावरही राणेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी जे मत व्यक्त केले आहे ते चुकीचे आहे, असे राणेंनी म्हटले आहे.