वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर या विधेयकाला राष्ट्रपतींनी देखील मंजुरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे विरोधी पक्षांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याचे दिसत आहेत. कारण सुरुवातीपासूनच विरोधक या विधेयकाला विरोध करत होते. तसेच या कायद्यामुलळे मुस्लिमांच्या हक्कांवर हल्ला होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, देशभरातील मुस्लिम समाज या विधेयकामुळे खूश असल्याचे दिसत आहे व मोदी सरकारचे आभार मानत आहेत. याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वक्फ बोर्डाची मनमानी व जमिनींवर अतिक्रमण यामुळे त्रस्त प्रत्येक समाजातील लोक सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचे कौतुक करत आहेत. दक्षिणेकडील केरळ राज्यातील 600 ख्रिश्चन कुटुंबे सरकारच्या या निर्णयामुळे एवढे आनंदी झाले आहेत की, त्यांनी रस्त्यावर येऊन आनंदोत्सव साजरा केला. व मोदी-मोदी तसेच नरेंद्र मोदी जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
खरं तर केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एका गावातील 400 एकर जमिनीवर वक्फने दावा केला होता. या जागेवर अनेक वर्षांपासून ख्रिश्चन समाजाचे लोक राहत आहेत. त्यांची मालमत्ता आणि जमिनीवर बेकायदेशीरपणे वक्फने कब्जा केल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. नागरिकांकडे या जागेच्या नोंदणीची कागदपत्रे आणि जमिनीची पेमेंट स्लिपही आहे. मात्र, असे असतानाही वक्फने या जागेवर कब्जा केला होता.
आता वक्फ सुधारित विधेयक मंजूर झाल्यानंतर या लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून त्यांना त्यांची जमीन परत मिळेल अशी आशा आहे.
दुसरीकडे, यूपीच्या अलीगडमध्ये मुस्लिम बांधवानी फटाके फोडून या विधेयकाचे स्वागत केले आहे. हे विधेयक गरीब मुस्लिमांसाठी फायद्याचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.