आज सकाळी देशातील शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर आयात शुल्क लागू केल्यानंतर ही घसरण झाली असल्याचं तज्ञांच मत आहे.
आज अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार लाल रंगात उघडला आहे. भारतातील शेअर बाजारातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे.
देशात सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स 3023.51 अंकांनी घसरून 72,341.18 वर व्यवहार करताना दिसला आहे. तर निफ्टीही घसरणीसह उघडला आहे. निफ्टी सकाळी 983.95 अंकांनी घसरून 21,920.50 वर व्यवहार करताना दिसला आहे.
सेन्सेक्समधील सर्व 30 शेअर आज लाल रंगात व्यवहार करत आहेत. यादरम्यान, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि एल अँड टी मध्ये देखील घसरण झाली आहे. सेन्सेक्स प्रमाणे निफ्टीमधील 50 शेअर आज रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसले आहेत.
अशातच शेअर बाजारासाठी आठवड्याचा पहिला सोमवार “ब्लॅक मंडे” ठरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या “टॅरिफ बॉम्ब”मुळे भारतासह अनेक देशातील शेअर बाजार आपटले आहेत.
भारतावर लावलेल्या २६ टक्के आयात कारामुळे विदेश गुंतवणूदारांनी भारतात गुंतवणूक करणे टाळत पाठ दाखवली आहे. ज्याचा परिणाम आज शेअर बाजारावर दिसून आला आहे.
तसं पाहायला गेलं तर गेल्या आठवड्यापासून शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसत आहे. पुढे देखील अशीच स्थिती कायम राहणार असल्याचं तज्ञांचं मत आहे. दरम्यान, आगामी काळात शेअर बाजार अजून कोसळणार असल्याची भीती देखील तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.