Kunal Kamra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. त्यांनतर शिवसैनिक आक्रमक झाले होते आणि कुणाल कामराविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती.
कामरा विरूद्ध तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी त्याला पोलिस स्टेशनला हजर राहून जबाब नोंदवावा असे समन्स बजावले होते. मात्र अद्याप कुणाल कामरा एकदाही चौकशीसाठी किंवा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये हजर झालेला नाही. उलट आता कामरानेच पोलिसांना एक पत्र लिहून नवीन मागणी केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्यात यावा, अशी मागणी त्याने पत्राद्वारे पोलिसांकडे केली आहे.
विशेष म्हणजे कुणाल कामरा त्याच्यावरील एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई हायकोर्टातही गेला होता. त्याने ५ एप्रिल रोजी एफआयर रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. एफआयआरची वैधता, अचूकता आणि योग्यतेला आव्हान देत कामराने एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
दरम्यान, कुणाल कामराने एका गाण्यामध्ये एकनाथ शिंदेचे नाव न घेता त्यांना गद्दार म्हटले आहे. घराणेशाही संपवण्यासाठी त्यांनी कुणाचातरी बाप चोरला. शिंदे मंत्री नाहीत तर हे दलबदलू आहेत. मंत्रालयापेक्षा जास्त हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवरच जास्त असतात अशा शब्दात कुणाल कामरालाने शिंदेवर टीका केली होती.