Deenanath Mangeshkar hospital: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सावळ्या गोंधळामुळे गर्भवती तनिषा सुशांत भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. रूग्णालयाच्या प्रशासनाने उपचार सुरू करण्यापूर्वी पैशांची मागणी केली, त्यानंतर आहे तेवढ पैसे लगेच भरायला आणि उर्वरीत पैसै लवकरच भरायची तयारी दाखवली असतानाही रूग्णालयाने उपचार न केल्याने पैशांअभावी तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेनंतर राज्य शासनाने डॉ. राधाकृष्ण पवार यांचा अध्यक्षतेखाली रूग्णालयाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती. नुकताच या समितीचा अहवाल समोर आला आहे. या समितीने रूग्णालयाला दोषी ठरवले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याविषयी माहिती दिली आहे.
रूपाली चाकणकर शासनाच्या अहवालाविषयी बोलताना म्हटल्या आहेत की, “रुग्णालयाने धर्मादायाची नियमावली पाळली नाही, हे शासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तनिषा यांना योग्य उपाचार मिळाले नाहीत. साडेपाच तास गर्भवती महिला मंगेशकर रुग्णालयात होती. त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्या वाचल्या असत्या. त्यांच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार आहे, असा अहवाल राज्य शासनाच्या समिताचा आहे. आता इतर दोन अहवाल उद्या येतील. त्यानंतर रुग्णालयावर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल”.
दरम्यान, या महिलेच्या पोटात जुळी अपत्ये होती त्यातच ब्लिडींग आणि बीपी वाढल्याने परिस्थीती गंभीर झाली होती. जेव्हा तनिषा यांना रूग्णालयात नेण्यात आले तेव्हा रूग्णालयाच्या प्रशासनाने २० लाख रूपये खर्च येईल असे सांगितले. प्रीमॅच्युअर डिलीव्हरी असेल, बाळांना सातव्या महिन्यामुळे NICU मध्ये ठेवावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. डॉक्टरांनी त्याचवेळी NICU चा खर्च प्रत्येक बाळाचा दहा-दहा लाख रुपये आहे. तुम्हाला आता २० लाख रुपये डिपॉझिट द्यावे लागतील, असे सांगितले. कुटुंबियांनी विनंती केल्यानंतर ते १० लाखांवरती आले, पण पूर्ण पैसे भरल्याशिवाय उपचार सुरू होणार नाहीत आणि तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ससूनला जाऊ शकता, असे रूग्णालयाने सांगितले होते.