मुंबईत १० एप्रिलपासून पाण्याची टँकर सेवा बंद होणार आहे. मुंबई महापालिकेने केंद्रीय भूजल प्राधिकरणाबाबत नवीन नियम लागू केल्यानंतर आणि बीएमसीच्या नोटीसनंतर मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. मुंबईवर आधीच पाण्याचे संकट ओढवलेले असताना हा निर्णय मुंबईकरांना धक्का देणार आहे.
मुंबईतील धरणांमध्ये केवळ ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, येत्या दिवसात पाण्याचा तुटवडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई महानगरपालिकेने नोटीस जारी केली असून, मुंबईतील विहीर आणि बोअरवेल मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार एनओसी घेणे आवश्यक आहे. जर एनओसी नसेल तर पाणी बंद करण्यात येईल असं नोटिशीत लिहिलं आहे.
अशातच बोअरवेल मालकांकडे एनओसी नसल्याचे आढळून आले तर पाणीपुरवठा कसा करणार? या चिंतेमुळे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने महानगरपालिकेच्या या निर्णयाच्या निषेधार्थ पाणी टँकर सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील विविध भागात आधीच पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने पाण्याचे टँकर बंद केल्यास मुंबईकरांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, मुंबईत गेल्या 80 वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच पाण्याच्या टँकरची सेवा बंद केल्यास मुंबईकर मोठ्या अडचणीत येऊ शकतात.