India Saudi Arabia: हज यात्रेला जाऊ पाहणाऱ्या यात्रेकरूंसाठी एक धक्कादायक बातमी आहे. सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तानसह 14 देशांवर तात्पुरती व्हिसा बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बंदीअंतर्गत उमराह, व्यवसाय आणि कुटुंब व्हिसावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सौदी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या 14 देशांवर ही व्हिसा बंदी घालण्यात आली आहे त्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया आणि येमेन या देशांचा समावेश आहे. बेकायदेशीरपणे हजमध्ये सहभागी होणे आणि व्हिसा नियमांचे उल्लंघन करणे, हे या तात्पुरत्या व्हिसा बंदीमागील मुख्य कारणे आहेत.
सौदी अरेबियाची ही व्हिसा बंदी जूनच्या मध्यापर्यंत राहणार आहे. हज यात्रेनंतर व्हिसा प्रक्रिया पुन्हा पूर्ववत केली जाणार असल्याचे सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र ज्यांच्याकडे उमराह व्हिसा आहे ते 13 एप्रिलपर्यंत सौदी अरेबियात प्रवेश करू शकतात, अशी माहिती सौदी परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी हज यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीत 1000 पेक्षा अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्य झाला होता. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनाधिकृतपणे यात्रेसाठी आलेल्या लोकांचा समावेश होता. त्याच पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला आहे.