कर्नाटकाची राजधानी बेंगळूरूमध्ये एका महिलेचा लैंगिक छळ झाल्यानंतर सर्वत्र हे प्रकरण तापलं आहे. बंगळुरूमध्ये रस्त्याच्या मधोमध महिलेसोबत झालेल्या घटनेनंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. भाजपसह विरोधी पक्षांनी महिला सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच आता कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांना या प्रकरणी विचारणा केली असता त्यांनी म्हंटल आहे की, ‘मोठ्या शहरांमध्ये अशा घटना वारंवार घडतात. जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती कायद्यानुसारच केली जाईल. मी पोलीस आयुक्तांना सतर्क राहण्यास सांगितले आहे’ गृहमंत्र्यांच्या याच विधानानंतर भाजपासह विरोधकांकडून संताप केला जात असून, सरकारवर सडकून टीका केली जात आहे.
काय प्रकरण आहे?
बेंगळुरूच्या सद्दुगुंटेपल्याजवळील रस्त्यावर एका महिलेचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दक्षिण पूर्व बंगळुरूच्या डीसीपी सारा फातिमा यांनी सांगितले आहे की, या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी बीएनएस कलम 74, 75, 78 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
या ठिकाणी महिलेसोबत घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेचा अज्ञात व्यक्तीकडून लैंगिक छळ झाल्याचे सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसून येत आहे. घटनेनंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.