पंजाबमधील बटाला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून स्फोटाच्या घटना घडत आहेत. दरम्यान, नुकतीच घडलेली एक घटना समोर आली आहे. बटाला जिल्ह्यातील किला लाल सिंग पोलीस ठाण्याजवळ रविवारी रात्री तीन स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. या स्फोटांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घाबरून घराबाहेर जमले होते. या स्फोटांच्या मालिकेमुळे परिसरात सध्या भीतीचे वातावरण आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला आहे. या स्फोटांची जबाबदारी हैप्पी पशियां ग्रुपने स्वीकारली आहे.
हैप्पी पशियां ग्रुपचा सदस्य असलेल्या मनू आगवान आणि गोपी नवांशहरिया यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत याची जबाबदारी घेतली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे की, ‘पिलीभीत आणि बटाला येथे पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा एन्काऊंटर केल्यामुळे बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी शिखांना त्रास देणे थांबवले नाही, तर अशाच प्रकारे बदला घेतला जाईल, अशी धमकीही पोस्टमध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान, येथील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भयंकर होता की झोपलेले लोक जागे होऊन रस्त्यावर जमले होते.