Akshay Shinde Encounter Case: बदलापूरच्या एका शाळेतील मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला होता. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. माझ्या मुलाचे एन्काऊंटर नसून तो नियोजनबद्ध कट आहे, अशा स्वरुपाचा दावा त्यांनी केला होता. तसेच त्यांनी यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
आता मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवरती मोठा निर्णय दिला आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमध्ये ज्या पोलिसांचा समावेश होता, त्या पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
न्यायालयाच्या या आदेशानंतर, आता अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा तपास मुंबईचे गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन केले जाणार आहे. हे तपास पथक अक्षयच्या एन्काऊंटरचा तपास करेल. सोबतच न्यायालयाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा निकाल दिला असला तरी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासही सरकारला मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, आता या प्रकरणी पोलिस निरीक्षक संजय शिंदे, ,सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, पोलिस हवालदार अभिजीत मोरे, पोलिस हवालदार हरीष तावडे यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाणार आहे. आता राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.