अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आयात कर (टॅरिफ शुल्क) लागू केल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेशी फोनवरून चर्चा केली आहे. जयशंकर यांनी सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. ट्रम्प यांनी आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच ही उच्चस्तरीय चर्चा झाली आहे. जयशंकर यांनी ‘एक्स’यावर या चर्चेविषयी माहिती दिली आहे.
जयशंकर एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करार लवकर पूर्ण करण्याबाबत एक करार झाला आहे.’ याशिवाय रुबियो यांच्याशी झालेल्या फोन कॉलमध्ये प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली आहे. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक प्रदेश, भारतीय उपखंड, युरोप, पश्चिम आशिया आणि कॅरिबियन प्रदेशातील परिस्थितीवर त्यांचे दृष्टिकोन मांडले आहेत. तसेच परस्पर संबंध अधिक मजबूत करण्यासाठी या क्षेत्रांमध्ये सहकार्य आणि समन्वयाची आवश्यकता आहे यावरही दोन्ही नेत्यांनी भर दिला.
https://twitter.com/DrSJaishankar/status/1909245681858195587
भारत आणि अमेरिका सध्या द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात वॉशिंग्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील बैठकीनंतर, दोन्ही बाजूंनी २०२५ पर्यंत पहिल्या टप्प्यातील व्यापार करारावर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याला संमती दर्शवली असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात, अमेरिकेचे सहाय्यक व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंच यांनी भारताला भेट दिली होती या भेटीत त्यांनी द्विपक्षीय व्यापार करार मजबूत करण्याबाबत भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.