मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याची भारताकडे प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची याचिका फेटाळून लावली आहे.
६४ वर्षीय पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिस मेट्रोपॉलिटन डिटेन्शन जेलमध्ये आहे. भारताकडे त्याचे प्रत्यार्पण रोखण्यासाठी त्याने एकामागून एक प्रत्यार्पण स्थगितीच्या याचिका दाखल केल्या होत्या.
२७ फेब्रुवारी रोजी तहव्वूर राणा याने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात प्रत्यार्पण स्थगितीची याचिका दाखल केली होती. ही याचिका गेल्या महिन्याच्या सुरुवातीच न्यायमूर्ती कागन यांनी फेटाळली होती. त्यांच्या याच निर्णयाविरुद्ध त्याने पुन्हा स्थगिती देण्यासाठी नवीन आपत्कालीन अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, राणाचा नवीन अर्ज ४ एप्रिल रोजी न्यायालयात पाठवण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय देत त्याचा अर्ज फेटाळला असल्याची माहिती देण्यात आली. ज्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
तहव्वूर राणा हा २६/११ हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याच्या जवळचा व्यक्ती आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. भारत सरकार गेल्या बऱ्याच दिवसांपासून राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होते. अशातच ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी त्याच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली.
https://twitter.com/Indian_Analyzer/status/1909274259018445224
कोण आहे तहव्वूर राणा?
तहव्वूर हुसेन राणा हा एक पाकिस्तानी-कॅनडियन दहशतवादी, व्यापारी आणि माजी लष्करी डॉक्टर आहे. जो दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये त्याच्या सहभागासाठी प्रसिद्ध आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यात देखील त्याचा हात होता असं बोललं जात.
तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात आहे. त्याचा मुंबई दहशदवादी हल्ल्यात सहभाग होता असा आरोप त्याच्यावर आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेविड कॉलमेन हेडलीशी त्याचा संबंध असल्याचे मानले जाते. म्हणून भारत दीर्घकाळापासून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे.
या प्रकरणी डेविड कॉलमेन याला सरकारी साक्षीदार बवण्यात आले आहे. अमेरिकेत त्याच्या चौकशीदरम्यान, हॅडलीने कबूल केले होते की, तो २००७ ते २००८ दरम्यान पाच वेळा भारतात आला होता आणि राणाने मिळवलेल्या पाच वर्षांच्या व्हिसाचा वापर करून मुंबई हल्ल्यांसाठी तयारी करत होता. त्याने मुंबई हल्ल्यात लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेची भूमिका देखील उघड केली तसेच राणाच्या मदतीने आपली ओळख लपवण्यासाठी त्याने इमिग्रेशन कंपनी उघडली होती असे देखील सांगितले.