गेल्या काही दिवसांपासून राज्यात सायबर गुन्हेगारी प्रमाण वाढत असताना त्याविरोधात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह झाले असल्याचे दिसून येत आहे. कारण नुकतेच फडणवीस यांच्या हस्ते दक्षिण मुंबई विभागाच्या निर्भया सायबर प्रयोग शाळेचे डी. बी. नगर पोलीस स्टेशन येथे उद्घाटन करण्यात आले आहे. यासोबतच मुंबई (मध्य) भागासाठी वरळी पोलीस स्टेशन येथील व मुंबई (पूर्व) भागासाठी गोवंडी पोलीस स्टेशन येथील सायबर प्रयोगशाळांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.महिलांविरोधातील सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, बँक हॅकिंग, मोबाइल व डेटा टेम्परिंगसारख्या गुन्ह्यांच्या जलद व अचूक तपासासाठी या प्रयोगशाळा क्रांतिकारी ठरणार आहेत.
जगातील अत्याधुनिक सायबर फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीने सज्ज असलेल्या या प्रयोगशाळांमुळे डिलीट झालेला डेटा ‘रिकव्हर’ करणे, पुरावे संकलन, आणि तपास प्रक्रियेला गती मिळणार आहे. सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जगभरातील सायबर सुरक्षा क्षेत्रातील सर्वोत्तम तंत्रज्ञान या प्रयोगशाळांमध्ये वापरण्यात येईल. यामुळे ऑनलाईन फसवणूक, किंवा बँक हॅकिंग सारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी देखील या प्रयोगशाळांचे महत्वाचे योगदान असेल.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेत शासन या प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कार्यक्रमास राज्यमंत्री योगेश कदम, अप्पर मुख्य सचिव, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.