Kedar Jadhav: भारतीय क्रिकेट टीमचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव आता क्रिकेटचे मैदान सोडून राजकीय मैदानात प्रवेश करणार आहे. केदार जाधव भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे( Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत आज (८ एप्रिल) तो मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
काही दिवसांपूर्वी केदार जाधवने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार तसेच रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तो राजकारणात प्रवेश करत भाजप पक्षात प्रवेश करेल,अशा चर्चांणा उधाण आले होते. केदार जाधवला आयपीएल(IPL) सामन्यातून अधिक प्रसिद्धी मिळाली होती. परंतु आता तो क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकीय आखाड्यात उतरत आहे.
केदार जाधवचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आहे. परंतु १९८० च्या दशकातच त्याचे कुटुंब पुण्यात स्थलांतरित झाले होते. त्यामुळे केदार जाधव पुणेकर म्हणूनच ओळखला जातो. केदार जाधवने त्याच्या कारकिर्दीत 73 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये 42.09 च्या प्रभावी सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. मात्र टी-20 सामन्यांमध्ये तो आपली जादू दाखवू शकला नाही. केदार जाधवने केवळ 9 टी-20 सामने खेळला असून त्यात त्याने केवळ 122 धावा केल्या आहेत. तर कसोटीमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
दरम्यान, यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन आणि गौतम गंभीर या भारतीय क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला होता. मोहम्मद अझरुद्दीन आणि गौतम गंभीर हे दोघेही खासदार राहिले होते. आता केदार जाधवही राजकारणात प्रवेश करत असल्याने केदार जाधवलाही आमदार किंवा खासदार होण्याची संधी मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.