अमेरिकेने भारतावर २६ टक्के आयात कर लादल्यानंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच सोमवारी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी देखील अमेरिकेच्या या निर्णयावर भाष्य केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६ टक्के आयात कर लागू केल्यानंतर दावा केला होता की, भारत अमेरिकन उत्पादनांवर ५८ टक्के आयात शुल्क लादतो. ट्रम्प यांचे हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले होते. यावर भाष्य करताना पियुष गोयल यांनी ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे की, भारत अमेरिकन उत्पादनांवर ५८ टक्के नाही तर फक्त ७-८ टक्के आयात शुल्क लावतो. हे शुल्क कोणत्याही प्रकारे जास्त नाही व ते जागतिक व्यापाराशी पूर्णपणे सुसंगत आहे.’
गोयल पुढे म्हणाले की, ‘भारत आपले व्यापारी संबंध निष्पक्षता आणि पारदर्शकतेने चालवतो. भारताचा असा विश्वास आहे की ते निष्पक्ष व्यापार पद्धतींचे पालन करणाऱ्या देशांसोबत व्यापार करार करू शकतात.’
पुढे त्यांनी असेही म्हंटले की, ‘अमेरिकेने भारतीय उत्पादनांवर २६ टक्के आयात कर लादणे अन्यायकारक आहे. हे दोन्ही देशांसाठी व्यावसायिक दृष्ट्या हानिकारक ठरू शकते.’
दरम्यान, भारताव्यतिरिक्त अमेरिकेने चीनवर 34 टक्के, युरोपियन युनियनवर 20 टक्के, दक्षिण कोरियावर 25 टक्के, जपानवर 24 टक्के, व्हियेतनामवर 46 टक्के व तैवानवर 32 टक्के आयात शुल्क लावले आहे. .अमेरिकेने जवळपास 60 देशांवर टॅरिफ शुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर 10 टक्के शुल्क लागू केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे.