MNS:सर्वोच्च न्यायालयात मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका मुंबईतील रहिवासी आणि महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे. राज ठाकरेंनी परप्रांतीयांविरोधात दिलेल्या कथित प्रक्षोभक वक्तव्यांवरून ही याचिका सादर करण्यात आली आहे.
आता यावर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे. याचिकेमागील षडयंत्र लक्षात घ्या. हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र आहे. हे भाजपाचे षडयंत्र आहे. हे याचिकाकर्ते लोक भाजपचेच पिट्टू आहेत. भाजपावाले या उभाविसेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना इथे ठेवायचे की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल.” असे संदीप देशपांडे म्हणाले.
आमचा पक्ष राहणार की नाही राहणार हे आता भय्ये ठरवणार असतील तर भय्ये मुंबईत राहणार की नाही, त्यांना इथे राहू द्यायचे की नाही हे आम्हाला ठरवावे लागेल, असेही देशपांडे म्हणाले.
दरम्यान सुनील शुक्ला यांनी याचिकेत राज ठाकरे यांच्या भाषणांचा उल्लेख करत, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात सातत्याने भडकावू वक्तव्य केल्याचे नमूद केले आले. राज ठाकरे आणि मनसेने निवडणूक आचारसंहिता आणि घटनात्मक सीमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोपही या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. शुक्ला यांनी याचिकेद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडणूक आयोगातील मान्यता रद्द करावी, राज ठाकरे यांना भडकावू वक्तव्य करण्यास मनाई करावी आणि गरज असल्यास तत्काळ अटक करण्याचे निर्देश द्यावेत, अशा मागण्याही याचिकेद्वारे केल्या आहेत.