RBI: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहारांशी संबंधित शुल्कांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या मोफत एटीएम व्यवहार मर्यादेनंतर पैसे काढण्यासाठी आता अधिक शुल्क मोजावे लागणार आहे. तसेच, इंटरचेंज फी आणि नॉन-फायनान्शियल व्यवहारांसाठीच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. हा नियम १ मे २०२५ पासून लागू होणार आहे.
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, १ मे २०२५ पासून, बँकांना त्यांच्या ग्राहकांकडून मोफत मर्यादेनंतरच्या प्रत्येक एटीएम व्यवहारासाठी २३ रूपये शुल्क मोजावे लागेल. सध्या अतिरिक्त एटीम व्यवहारासाठी २१ रूपये शुल्क आकारण्यात येतो. म्हणजेच आता प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी ग्राहकांना २ रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक बँक ग्राहकाला आपल्या स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून दरमहा ५ मोफत व्यवहार करण्याची परवानगी आहे.
तसेच आरबीआयने बँकांमधील एटीएम इंटरचेंज फी मध्ये देखील वाढ केली आहे .एटीएम इंटरचेंज फी म्हणजे, जेव्हा एका बँकेचा ग्राहक दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरतो, तेव्हा ग्राहकाच्या बँकेकडून एटीएम सेवा पुरवणाऱ्या बँकेला दिले जाणारे शुल्क. या फीमध्येही प्रति आर्थिक व्यवहार २ रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एटीएम इंटरचेंज फी १७ रुपयांवरून १९ रुपये करण्यात होणार आहे.
दरम्यान, आता आरबीआयने , नॉन-फायनान्शियल व्यवहारांसाठीसुद्धा ६ रुपये शुल्क प्रति व्यवहार केले आहे. यामध्ये बॅलन्स चौकशी (Balance Enquiry), मिनी स्टेटमेंट इत्यादींचा समावेश होतो. आरबीआयने हा शुल्कवाढीचा निर्णय व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर्सच्या मागणीवरून घेतला आहे.