केंद्र सरकारची आयुष्मान भारत योजना देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवत आहे. २३ सप्टेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथून या योजनेची सुरुवात केली होती. पंतप्रधानांच्या या योजनेअंतर्गत, पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जातो. केंद्र सरकारच्या या योजनेचा आतापर्यंत अनेक गरीब कुटुंबांनी फायदा घेतला आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती रुग्णांना फायदा झाला आहे. याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, ३१ जानेवारी २०२५ पर्यंत, या योजनेअंतर्गत ८.५ कोटी रुग्णांनी केंद्र सरकारने नेमून दिलेल्या रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत. यापैकी ४.२ कोटी लोकांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले व ४.३ कोटी रुग्णांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी लोकसभेत यासंबंधित माहिती दिली आहे.
या रुग्णालयांमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकता
जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल आणि तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असेल, तर तुम्ही सरकारी पॅनेलमध्ये असलेल्या रुग्णालयांमध्ये जाऊन मोफत आणि कॅशलेस उपचार घेऊ शकता. तुम्ही कुठे उपचारासाठी जाऊ शकता अशा रुग्णालयांची यादी देखील खाली दिली आहे.
https://nha.gov.in/img/resources/PMJAY-Hospital-List.pdf
पंतप्रधान मोदींच्या आयुष्मान योजनेचे उद्दिष्ट देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना आरोग्य विमा सुविधा प्रदान करणे आहे. आर्थिक सक्षम लोक पैसे देऊन खाजगी आरोग्य विमा कंपनीकडून पॉलिसी खरेदी करतात. परंतु आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना आरोग्य विम्यापासून वंचित राहावे लागते. अशातच आता सरकारने अशा वंचित घटकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले आहे. या योजनेद्वारे, गरीब लोकांना गंभीर आजारांवर देखील मोफत उपचार मिळू शकतात.