समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा आणि माजी आमदार अब्दुल्ला आझम खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर स्टॅम्प चोरीचा गंभीर आरोप ठरला असून, रामपूरच्या डीएम कोर्टाने त्यांना ३ कोटी ७१ लाख ८७८ रुपयांचा दंड ठोठावला आहे. अब्दुल्ला आझम यांनी २०२१-२२ दरम्यान २६ बिघा जमिनीची खरेदी केली होती, ज्यात स्टॅम्प शुल्कात बचत करण्यासाठी धोका निर्माण करण्यात आला होता. त्यावर आधारित तपास सुरू झाला आणि २०२३ मध्ये संबंधित एसडीएमने या प्रकरणाची तपासणी करून डीएम कडे अहवाल पाठवला होता. यावरून स्टॅम्प चोरीचे आरोप सिद्ध झाले असून न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये, अब्दुल्ला आझम खान यांची हरदोई तुरुंगातून सुटका झाली होती, जिथे ते सुमारे दीड वर्षे कैदेत होते. कडक सुरक्षेत तुरुंगाच्या गेटमधून बाहेर आल्यानंतर, ते थेट रामपूरला गेले. गेल्या काही वर्षांत त्याच्यावर ४५ गुन्हे दाखल झाले होते, पण सर्वांमध्ये त्यांना जामीन मिळाला होता. तथापि, स्टॅम्प चोरीच्या प्रकरणात त्यांना आता कोर्टाने मोठा दंड ठोठावला आहे.
अब्दुल्ला आझम यांनी २०२१ मध्ये ४ वेगवेगळ्या जमिनींच्या खरेदीवर स्टॅम्प ड्युटी चुकवली असल्याचे आरोप आहेत. त्या आधारावरच डीएम कोर्टात हा खटला दाखल करण्यात आला मात्र मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी अब्दुल्ला आझम कोर्टात उपस्थित नव्हते. या प्रकरणाची सुनावणी २०२३ पासून डीएम कोर्टात सुरू होती. मात्र, आता निर्णय आला असून आझम खान यांच्या मुलाला दंड ठोठावण्यात आला आहे.