26/11 हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतातील तपास यंत्रणांचे पथक अमेरिकेत पोहोचले असून, अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत तहव्वूर राणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यात व्यस्त आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला कोणत्याही क्षणी भारतात आणले जाऊ शकते.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, दहशतवादी तहव्वूर राणा याचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला होता. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहव्वूरची याचिका फेटाळून लावली होती, ज्यामध्ये त्याने भारताकडे प्रत्यार्पणाच्या निर्णयावर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. जर त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले गेले तर त्याचा तिथे मानसिक आणि शारीरिक छळ होऊ शकतो. असं त्याने याचिकेत म्हंटल होत. मात्र, न्यायालयाने त्याची ही याचिका फेटाळत भारताकडे प्रत्यार्पणाचा निर्णय कायम ठेवला होता.
राणाने आपले प्रत्यार्पण थांबवण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आपत्कालीन याचिका दाखल केली होती. अर्जात त्याने दावा केला होता की तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम आहे. त्यामुळे, भारतात त्याचा छळ होईल, म्हणून त्याचे प्रत्यार्पण थांबवावे. तसेच राणाने तब्येतीचे कारणही दिले होते.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार असल्याचे जाहीर केले होते. भारताने गेल्या दीर्घकाळापासून तहव्वूर राणाला भारताकडे सोपवण्याची मागणी केली होती. ट्रम्प यांनी ही मागणी पूर्ण करत त्याला भारताकडे सोपवण्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले होते.
तहव्वूर राणा हा दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये त्याच्या सहभागासाठी प्रसिद्ध आहे. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात आहे. त्याचा मुंबई दहशदवादी हल्ल्यात सहभाग होता असा आरोप त्याच्यावर आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेविड कॉलमेन हेडलीशी त्याचा संबंध असल्याचे मानले जाते. म्हणून भारत दीर्घकाळापासून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे.
दरम्यान, 2008 च्या मुंबई हल्ल्यात देखील त्याचा हात होता असं बोललं जात आहे.