सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात ट्रॅफिक कर (आयात शुल्क) आकारण्यावरून युद्ध सुरु आहे. अमेरिकेने नुकतीच घोषणा केली आहे की, ९ एप्रिल २०२५ पासून चीनवर १०४ टक्के टॅरिफ कर लावला जाईल. त्यांनंतर आता दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरं तर ट्रम्प यांनी भारत, चीनसह अनेक देशांवर टॅरिफ कर लावला आहे. भारतावर २६ टक्के तर चीनवर २० टक्के कर लादण्यात आला होता. पण ट्रम्प यांच्या निर्णयाला उत्तर देत चीनने अमेरिकेवर ३४ टक्के टॅरिफ कर लावला. चीनच्या याच निर्णयाला प्रत्युत्तर देत अमेरिकेने १०४ टक्के टॅरिफ कर लावला आहे.
याचदरम्यान आता चीन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चीन आता देशात हॉलिवूड चित्रपटांवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे. एका वृत्तानुसार, चीन अमेरिकेचे टॅरिफ धोरण कोणत्याही परिस्थिती स्वीकारणार नाही. आणि अमेरिकेने टॅरिफ कर लादल्यास चीन देखील अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणार. त्यातलेच एक पाऊल म्हणजे, देशात हॉलिवूड चित्रपटांवर बंदी आणणे.
कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असलेल्या एका चिनी पत्रकाराने बीबीसीच्या ‘रेडिओ ४’ कार्यक्रमात सांगितले की, ‘देश सोयाबीनसारख्या अमेरिकन कृषी निर्यातीवर जास्त शुल्क लादेल. यामुळे सर्व अमेरिकन पोल्ट्रींना चीनमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येईल आणि अमेरिकन चित्रपटांना देशात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात येईल.
दरम्यान, चीनवर लादलेले हे टॅरिफ शुल्क जगभरातील व्यापारावर परिणाम करू शकते. एकूणच दोन्ही देशात सुरु असलेल्या या टॅरिफ वादामुळे भविष्यातील व्यापार धोरणांवर मोठा प्रभाव पडणार असल्याचे चित्र आहे.