भारतीय नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या मेगा डीलला सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) मंजुरी दिली आहे. हा करार सुमारे ६३,००० कोटी रुपयांचा आहे.हा करार लवकरच अंतिम केला जाणार असून त्यावर स्वाक्षरी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या करारांतर्गत भारतीय नौदलाला २२ सिंगल-सीटर आणि ४ ट्विन-सीटर असे एकूण २६ अत्याधुनिक राफेल सागरी लढाऊ विमाने मिळणार आहेत. ही जेट्स डसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्सच्या नामांकित कंपनीकडून तयार करण्यात येणार आहेत.ही विमाने भारतीय नौदलासाठी गेम-चेंजर ठरणार आहेत. समुद्रात शत्रूविरोधी मोहिमांमध्ये ही विमाने निर्णायक भूमिका बजावणार आहेत. विशेष म्हणजे, हे राफेल जेट विमानवाहू युद्धनौकांवरूनही ऑपरेट करता येणार आहेत, ज्यामुळे भारताची समुद्रावरची पकड आणखी मजबूत होणार आहे.
राफेल एम जेट्सची पहिली डिलिव्हरी २०२९ च्या अखेरीस सुरू होऊ शकते. सर्व २६ जेट्स २०३१ पर्यंत भारतीय नौदलाला देण्यात येतील. ही लढाऊ विमाने आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत सारख्या भारतीय विमानवाहू जहाजांवर तैनात केली जातील. हे जुन्या मिग-२९के लढाऊ विमानांची जागा घेतील, जी आता जुनी झाली आहेत. भारतीय नौदलासाठी खरेदी करण्यात येणारी राफेल एम लढाऊ विमाने विशेषतः सागरी आवश्यकतांनुसार डिझाइन करण्यात आली आहेत. ही जेट्स मेटीओर, एक्सोसेट आणि स्कॅल्प सारखी धोकादायक आणि प्रगत क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे त्यांची लढाऊ क्षमता खूप मजबूत होते.
या करारामुळे भारताच्या नौदल आणि वायुदलाची क्षमता प्रचंड वाढणार असून चीन आणि पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांवर सामरिक दबाव वाढवण्यास भारताला मदत होणार आहे. हा करार केवळ संरक्षणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर भारताच्या जागतिक सामरिक शक्तीला एक नवीन ओळख देणारा ठरणार आहे.