काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून दूर होत महायुतीत सामील झाले. आणि त्यांनी लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका शिवसेना आणि भाजपसोबतच लढल्या अर्थात लोकसभा निवडणूकीत अजित पवारांना फटका बसला तरी त्यांनी विधानसभा निवडणूकीत विशेष लक्ष घातले आणि पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.आता अजित पवारांनी वेगळी चूल मांडली असली किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली, तरी दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये संपर्क सुरूच असतो. वेगवेगळ्या कारणांनी हे नेते एकमेकांना भेटत असतात, संवादही साधत असतात. विशेष म्हणजे, दोन्ही बाजूंनी शरद पवार यांना आपला आदर्श मानलं जातं. यामुळे राष्ट्रवादीचे हे विभाजित गट पुन्हा एकत्र येतील का, याबाबतची चर्चा अधूनमधून राजकीय वर्तुळात उठत असते. अशा पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नुकतेच शरद पवारांविषयी आदराचेच बोल उच्चारले. “शरद पवार हे माझ्यासाठी कालही दैवत होते आणि आजही दैवत आहेत,” असं भावनिक वक्तव्य त्यांनी केलं, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना नवा सूर मिळाला.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा पिंपरी सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. याच कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी शरद पवारांबाबत बोलताना मोठे विधान केले. आम्हीसुद्धा आमच्या कुटुंबात कालही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण तळ्यात मळ्यात केल्यास निर्णय घेता येत नाहीत, असे अजित पवार म्हणाले. आज देशाला मोदींसाहेबांसारखा नेता मिळाला आहे. देशाची मान जगात उंचावत आहे. त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवं. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला, असे म्हणत अजित पवार यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचे कारणही सांगितले.
आपल्या भाषणादरम्यान अजित पवारांनी जागतिक बाजारपेठेतील चढ-उताराचाही उल्लेख केला. “डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अनेक देशांना फटका बसला आहे. कोविडनंतरचं हे सर्वात मोठं संकट आहे,” त्याचा आपल्याला सामना करायचा आहे, पंतप्रधान मोदी यांचे अनेक देशांशी चांगले संबंध आहेत.याचा आपल्याला नक्की फायदा होईल, असा विश्वासही अजित पवारांनी व्यक्त केला. पण या सगळ्यात खरी चर्चा झाली ती अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या विधानाची
दरम्यान, यापूर्वीही अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना एका भाषणामध्ये शरद पवारांबाबत विधान केले होते. त्यावेळी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना आपल्या स्वागतासाठी कोणतीही शाल, हारतुरे किंवा स्मृतिचिन्ह न आणण्याची विनंती केली होती. आई-बापाच्या व चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले असल्याचे ते यासंबंधी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार का? अशी चर्चा रंगताना दिसून आली.