केंद्र सरकारकडून नागरिकांच्या गोपनीयतेचं आणि अधिकारांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, नवीन आधार कायदा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट 2023 (DPDP Act) च्या चौकटीत तयार केला जाईल. “नागरिक हा आपल्या प्रत्येक धोरणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे,” असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. तसेच समाजातील उपेक्षित वर्गाला सशक्त करणं हा आमचा मूलमंत्र आहे, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.
नवीन आधार अॅपच्या लॉन्चवेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते यावेळी बोलताना वैष्णव यांनी सांगितलं की, “जेव्हा मूळ आधार कायदा अस्तित्वात आला, तेव्हा भारताकडे डेटा संरक्षण व गोपनीयतेसंदर्भात व्यापक कायदा नव्हता. मात्र, आता आपल्याकडे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट 2023 आहे. (DPDP) कायदा तयार झाला असून त्याचे नियमही लवकरच जाहीर होतील.” त्यांनी यावेळी हेही सांगितलं की, या कायद्यासंदर्भात विस्तृत सल्लामसलत झाली असून, तो एक अत्याधुनिक कायदेशीर आराखडा असणार आहे.
नवीन कायद्याचा मुख्य उद्देश नागरिकांना, विशेषतः समाजातील उपेक्षित व गरजू घटकांना, केंद्रस्थानी ठेवणे आहे. “आपल्याला गरीबांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवायचा आहे. त्यांना त्यांच्या हक्काच्या सेवा सहज मिळाव्यात, हेच आमचं ध्येय आहे,” असं ते म्हणाले. नागरिकांना आता वेगवेगळ्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन द्यावी लागणार नाही. एक गरीब आईला तिच्या सर्व सर्व्हिसेससाठी सोपी पद्धत उलब्ध व्हावी हा या कायद्याचा फोकस असणार आहे. समाजातील इन्कम पिरॅमिडमध्ये गरीबातील गरीब लोक आहे, त्यांच्यावर फोकस आम्ही दिला आहे. त्यांच्या जीवनात बदल आणायचा आहे. हा आमचा जगण्याचा धर्म आहे. आमच्या गव्हर्न्सचं महत्त्वाचं पाऊल आहे. हा मोदी सरकारचा सर्वात मोठा फोकस आहे, असंही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं.
शेवटी वैष्णव म्हणाले की आपल्याला गरीबांसाठी जगायचं आहे, गरीबांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी जगायचं आहे आणि गरीबांसाठी काम करायचंय आहे. देशाला मजबूत करण्याचं आपलं उद्दिष्ट्ये आहे. समाजातील सर्वात उपेक्षित वर्गाला सशक्त करावे, हा आमचा मूलमंत्र आहे. याच मूलमंत्रावर नवीन कायदा आणा. याच मूलमंत्रावर जेवढ्या आधारशी संबंधित सुविधा आहेत, त्या आणखी चांगल्या करा, असे निर्देशही त्यांनी दिले. पण आता या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट 2023 चा सर्व सामन्यांना कसा फायदा होतो ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.