पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच प्रसारमाध्यमांनी आयोजित केलेल्या Rising Bharat Summit या कार्यक्रमात बोलताना सांगितले की, त्यांच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांत 100 पेक्षा जास्त ठोस निर्णय घेण्यात आले. “विलंब म्हणजे विकासाचा शत्रू” असा नारा देत त्यांनी या कालावधीत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. या कालावधीत ‘मेड इन इंडिया’ लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्सच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली आणि वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
मुद्रा योजनेचा मोठा टप्पा पूर्ण
मोदींनी मुद्रा योजनेच्या यशावरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, मागील 10 वर्षांत 52 कोटींहून अधिक कर्ज हमीशिवाय वितरित करण्यात आले असून त्यातून 11 कोटी नागरिकांना पहिल्यांदा स्वयंरोजगार सुरू करण्याची संधी मिळाली. यामुळे ही मंडळी आता नवउद्योजक बनली आहेत. त्यांनी याचे आणखी उदाहरण देत सांगितले की, एकट्या मुद्रा योजनेअंतर्गत 37 लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले असून, हे आकडे अनेक देशांच्या GDP पेक्षा अधिक आहेत.
मागास जिल्ह्यांचा विकास आणि वक्फ कायदा सुधारणा
पंतप्रधानांनी यावेळी मागास जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांची नियुक्ती करून तेथील परिस्थिती बदलल्याचे नमूद केले.याआधी मागासलेल्यांना मागास राहू द्यावे अशी मागील सरकारची कल्पना होती. त्यानंतर मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने या जिल्ह्यामध्ये काम केले आणि आज तेच जिल्हे विकासाच्या मार्गावर आहेत. आज तेथील तरुण आम्ही हे करू शकतो, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.असे ते म्हणाले आहेत.
वक्फ सुधारणा विधेयकावर बोलताना मोदींनी स्पष्ट केले की, 2013 मध्ये आणलेल्या दुरुस्त्या केवळ काही कट्टरपंथी आणि जमीन दलालांना खुश करण्यासाठी होत्या. तर आताचे विधेयक पारदर्शकता आणणारे असून, मुस्लिम समाज आणि विशेषतः मुस्लिम महिलांचे संरक्षण करणारे आहे. त्यांनी केरळातील ख्रिश्चन कुटुंब, कर्नाटकातील शेतकरी आणि हरियाणातील गुरुद्वारांचे उदाहरण देत या सुधारणा किती व्यापक परिणाम घडवू शकतात, याची माहिती दिली. या विधेयकावर संसदेत 16 तासांहून अधिक चर्चा झाली असून, संसदेच्या 75 वर्षांच्या इतिहासातील हे दुसरे मोठे विधेयक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.