मणिपूरमध्ये सध्या अशांततेचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करूनही अद्याप याला यश आले आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. नुकटाच आता चुराचंदपूर जिल्ह्यात दोन जमातींमध्ये संघर्ष घडून आल्याने काही भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. हा वाद गावांमध्ये झेंडे लावण्यावरून सुरु झाला असल्याचे बोलले जात आहे.
काय घडलं नेमकं?
मंगळवारी के. व्ही. मुनहोईह आणि रेंगकाई या गावांमध्ये जमातींचे झेंडे फडकवण्यात आले. यावरून दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला.हिंसाचाराच्या घटनेनंतर कांगवई, समुलामलान आणि संगाईकोट भागांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे चुराचांदपूरचे जिल्हाधिकारी धारून कुमार यांनी ही कारवाई केली आहे.
कर्फ्यूमध्ये काही सवलती:
इतर भागांमध्ये 17 एप्रिलपर्यंत दररोज सकाळी 6 ते संध्याकाळी 5 या वेळेत कर्फ्यू सवलत दिली जाईल. गरजेच्या वस्तू आणि सेवा मिळाव्यात यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.यासाठी स्थानिक प्रशासनाने गावकऱ्यांसोबत बैठक घेतली.सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, असा इशारा देण्यात आला आहे. गावकऱ्यांनी देखील शांतता राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
आधीही झाली होती हिंसा
आता हा वाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे असे नाही तर 18 मार्च रोजीही याच दोन जमातींमध्ये वाद झाला होता. त्या वेळी झालेल्या वादात एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. मोबाईल टॉवरवर लावलेला झेंडा खाली फेकल्याने हा वाद विकोपाला गेला होता. आता सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी सुरक्षा यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मणिपुरमधील हिंसाचार आणि असे गटागटात होणारे वाद खरतर सातत्याने डोकं वर काढताना दिसत आहेत. तिथले स्थानिक प्रशासान यावर अंकुश लावण्याचा प्रयत्नही करत आहे मात्र असे असतानाही अशा घटना अधून मधून घडताना दिसून येतात. नुकताच भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अस्कर अली यांनी WAQF (सुधारणा) विधेयक २०२५ चे समर्थन केल्याने यांच्या निवासस्थानावर काही कट्टरतावाद्यांनी हल्ला केला होता.या हल्यात त्यांचे घर जाळून टाकण्यात आले होते. त्यावेळी भाजपकडून या कृत्याचा निषेध करण्यात आला होता. पण आता ही नवीन घटना समोर आल्याने पुन्हा एकदा राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा घटनांवर वेळीच लगाम घालणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होता आहे.