Supriya Sule: मुंबई व पुणे शहरामध्ये रस्त्यांचे काम व मेट्रोचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. परंतु भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. भोरमधील जवळपास अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अवकाळी पावसाचा देखील रस्त्यांना मोठा फटका बसला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे या ९ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भोरमध्ये आंदोलनला बसल्या होत्या.
यावेळी सुप्रिया सुळेंनी बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करण्याची मागणी केली आहे. अनेकदा पाठपुरवठा करुन देखील हे काम केले जात नसल्यामुळे तसेच प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवात केली जात नाही. यामुळे देवस्थानाला भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गैरसोय होत आहे, त्यामुळे आंदोलन करत असल्याचे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही, आम्हाला केवळ रस्त्याची दुरुस्ती हवी आहे, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.
परंतु आश्चर्याची बाब म्हणजे सुप्रिया सुळे २००९ पासून ते आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि भोर तालुका बारामती मतदारसंघातच येतो. गेली पंधरा वर्ष खासदार म्हणून काम करत असताना सुप्रिया सुळेंना एकदाही भोरमधील रस्त्यांसाठी निधी आणता आला नाही का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे राज्यात काही वेळा त्यांचा पक्ष सत्तेत असतानाही सुप्रिया सुळेंना भोरच्या रस्त्यांचा प्रश्न आठवला नसावा का?, मग आता उन्हात बसून त्यांना केवळ स्टंटबाजी करायची आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून भोर तालुक्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अर्थातच पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये शरद पवार पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते प्रभावी राहिले आहेत. त्यामुळे प्रशासकीय धोरणे आणि अंमलबजावणीवर पक्षाचा विचार आणि नेतृत्वाचा प्रभाव दिसून आला होता, मग तेव्हा सुप्रिया सुळेंना भोरच्या रस्त्यांचा प्रश्न प्रशासनामार्फत सोडवता आला असता, असे देखील काहीजण म्हणत आहे.
दरम्यान, अजित पवारांना सुप्रिया सुळेंच्या या आंदोलनाबद्दल विचारले असता त्यांनी सुळेंना खोचक टोला लगावला. केवळ सहाशे खासदारांना पाच कोटींचा निधी मिळतो. रस्ता करायचा म्हटले तर या निधीतून करता येतो. त्या एका मिनिटात रस्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात, असा टोला त्यांनी सुळेंना लगावला आहे. अर्थातच अजित दादांच्या बोलण्यातूनही हे स्पष्ट जाणवते की, खासदार निधीतून भोरचा रस्ते व्यवस्थित करता येऊ शकतात.