CSK Vs Mumbai Indiance: यंदा भारतीय प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे 18 वे वर्ष आहे. आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यासाठी दहा संघांमध्ये जवळपास दोन महिने हा रणसंग्राम चाललेला असतो. जगातले उत्तम क्रिकेटपटू यामध्ये सहभागी होतात. अशा या 18 वर्षांमध्ये केवळ दोन संघांचा दबदबा या लीगमध्ये तुलनेने जास्त दिसून येत होता. ते दोन संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स. गेल्या अठरा वर्षात प्रत्येकी पाच वेळा या दोन संघांनी विजेतेपद पटकावले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही संघांचे वर्चस्व कमी होताना दिसत आहे.
त्यातच यावर्षी हे दोन्ही संघ पिछाडीवर दिसत आहेत. 22 मार्च 2025 पासून सुरू झालेल्या लीग मध्ये या दोन संघांचे आतापर्यंत प्रत्येकी पाच सामने झाले आहेत. परंतु दोन्ही संघ त्यापैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवु शकले आहेत. या संघाच्या अपयशामागे काही महत्त्वाची कारणे आहेत ते आपण समजावून घेऊयात.
-संघाच्या अपयशामागे संघ निवड आणि संघ नियोजन ही सर्वात महत्त्वाची कारणे असतात. आयपीएलच्या लिलावामध्ये योग्य खेळाडूंची निवड न केल्यामुळे हे संघ एक मजबूत संघ बनण्यास अक्षम ठरले आहेत, असे म्हणावे लागेल. कारण चांगले फलंदाज व गोलंदाज नसल्यामुळे हे दोन्ही संघ कमकुवत असल्याचे भासतात.
– त्याचप्रमाणे संघांचं नेतृत्व नवीन खेळाडूंकडे सोपवले गेलं जसे की मुंबई संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या कडे व चेन्नई संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आले आहे. अनुभवाच्या कमतरतेमुळे हे नवीन खेळाडू संघाला एक सक्षम नेतृत्व प्रदान करू शकत नाहीत असे तज्ञांचे म्हणणे आहे.
-त्याचप्रमाणे सामन्यांमध्ये दोन्ही संघांच्या रणनीतीमध्ये चुका झालेल्या दिसून येतात. दोन्ही संघांचा फलंदाजी क्रम वेळोवेळी बदललेला दिसतो. यशस्वी रीतीने धावाचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा चेन्नई संघ यावर्षी तीन वेळा अपयशी ठरलेला दिसतो. याचे कारण चेन्नईचा मुख्य फलंदाज Devon Conway पहिल्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध नसल्यामुळे व चेन्नई संघाचे फिनिशर्स अपयशी ठरल्याचे सांगण्यात येते.
– त्याचप्रमाणे मुंबई संघातील पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरणारे Ryan Rickelton व Rohit Sharma हे फलंदाज धावा मिळवण्यात अपयशी ठरलेले दिसतात. त्याचप्रमाणे मुंबई संघाचा फिनिशर म्हणून ओळखला जाणारा संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या हा देखील म्हणावी तशी कामगिरी करताना दिसत नाहीये.
गोलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही संघ वेगवेगळ्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. मुंबई हा संघ वेगवान गोलंदाजासाठी प्रसिद्ध आहे तर चेन्नई हा संघ फिरकीपटूंसाठी प्रसिद्ध आहे. परंतु चेन्नई संघाचा भार एकट्या नूर अहमद वर येऊन ठेपला आहे. रवींद्र जडेजा या वर्षी चांगली कामगिरी करताना दिसून येत नाहीये. त्याचप्रमाणे मुंबई संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमरा हा दुखापतीमुळे संघा बाहेर आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीचा पूर्ण भार ट्रेंट बोल्ट या गोलंदाजावर पडत आहे.
-त्याचप्रमाणे रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांवर चाहते नाराज झालेले दिसत आहेत. अगोदरच या दोन खेळाडूंच्या वयामुळे त्यांच्या फिटनेस वर प्रश्नचिन्ह उभा केलेलं असताना या दोन खेळाडूंकडून चांगली कामगिरीही होताना दिसून येत नाहीये. रोहित शर्मा तीन सामन्यांमध्ये केवळ 21 धावा मिळविण्यास सक्षम ठरला आहे.
-तर महेंद्रसिंग धोनी त्याच्या स्ट्राईक रेट मुळे टीकेचे कारण बनला आहे. रविवारी झालेल्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी याने शेवटच्या काही षटकांमध्ये रिक्वायर्ड रन रेट चा विचार न करता 26 चेंडूमध्ये मध्ये केवळ 30 धावा मिळविल्या. त्यामुळे संघाला हार पत्करावी लागली असे अनेकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, आता मुंबई संघामध्ये जसप्रीत बुमराचे पुनरागमन व चेन्नई संघामध्ये Devon Conway याचे पुनरागमन होत आहे. यामुळे दोन्ही संघांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. येणाऱ्या काळात पुढील चार सामने या दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत.