Tahawwur Rana: भारतावर झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आले आहे. तहव्वूर राणाला घेऊन आलेले विशेष विमान आज (ता. 10 एप्रिल) भारताच्या एअरस्पेसमध्ये दाखल झाले असून थेट दिल्लीतील पालम एअरपोर्टवर लँड केले गेले आहे. त्यानंतर त्याला आता थेट राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुख्यालयात नेण्यात येणार आहे.
त्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पालम विमानतळावर अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चार इनोव्हा, दोन सफारी गाड्यांसह जॅमर यंत्रणा, बॉम्ब शोध पथक आणि इतर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्या होत्या. आता पुढील काही तासातच त्याला एनआयएच्या मुख्यालयात नेऊन त्याच्या अधिकृत चौकशीस सुरुवात केली जाणार आहे. या चौकशीनंतरच 26/11 च्या हल्ल्यात त्याची भूमिका किती खोल आहे, त्याच्याशी संबंधित कोणते नवे पुरावे मिळू शकतात, हे स्पष्ट होईल.
दरम्यान, पाकिस्तानात जन्मलेला तहव्वूर राणा याच्यावर अनेक देशांमध्ये गंभीर आरोप झाले असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. भारताने गेल्या दीर्घकाळापासून तहव्वूर राणाला भारताकडे सोपवण्याची मागणी अमेरीकेकडे केली होती. त्यानंतर अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अखेर आज राणाला भारतात आणण्यास भारताला यश मिळाले आहे. देशद्रोह आणि दहशतवाद प्रकरणी हे पाऊल सरकारसाठी आणि तपास यंत्रणेसाठी मोठे यश मानले जात आहे.
दरम्यान, 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेविड कॉलमेन हेडलीशी त्याचा संबंध असल्याचे मानले जाते. म्हणून भारत दीर्घकाळापासून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. आता त्याच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.