गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणि इतरही जेवढे ‘धर्मादाय रुग्णालय आहेत त्यांच्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे आता सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे ‘धर्मादाय’ असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली. “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने धर्मादाय रुग्णालय असूनही तनिषा भिसे यांना त्यामाध्यमातून मदत न केल्याचे चौकशी अहवालातही समोर आले आहे. या अनुषंगाने अनेक रुग्णालये धर्मादाय असूनही त्याची माहिती देत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना मदत मिळत नाही हे निदर्शनास आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकालाही चांगले उपचार मिळावे यासाठी असलेला धर्मादाय रुग्णालयाचा हेतूच साध्य होत नाही. तेव्हा सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे ‘धर्मादाय’ असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, तसेच त्या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा आणि नियम यांची माहितीही तिथे लावावी. यासाठी आयोगाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाला तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
धर्मादाय रुग्णालय म्हणजे काय?
धर्मादाय रुग्णालय म्हणजे असं रुग्णालय जे माणुसकीच्या दृष्टिकोनातून आणि सेवाभावाने चालवलं जातं. यामध्ये काही किंवा सर्व उपचार विशेषतः गरजू, गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी.मोफत किंवा कमी दरात दिले जातात. प्रामुख्याने धर्मादाय रुग्णालये विविध धार्मिक संस्थांद्वारे चालवली जाऊ शकतात, जसे की मंदिर, गुरुद्वारा, मशीद किंवा इतर धार्मिक संघटनांच्या माध्यमातून.उदा. नेत्र ज्योती रुग्णालय जळगाव. मोहन ठोसे नेत्रालय नारायणगाव. शिर्डी साई बाबा रुग्णालय, सत्य साई संस्था पुत्तपर्थी.
धर्मादाय रुग्णालयाची मुख्य वैशिष्ट्ये:
अशा रुग्णालययांना सरकारकडून काही सवलती मिळत असतात (जसं की कर सवलत), पण त्याच्या बदल्यात त्यांना गरीब रुग्णांना मदत करणं बंधनकारक असतं.
याशिवाय इथं काही टक्केवारीने बेड गरीबांसाठी राखीव ठेवलेले असतात.काही औषधे, चाचण्या किंवा सर्जरी मोफत किंवा कमी दरात दिल्या जातात.
उद्देश काय असतो?
गरीब आणि गरजू लोकांनाही चांगल्या उपचारांची संधी मिळावी, हा यामागचा मुख्य हेतू असतो.
कोणाला मोफत व सवलतीत उपचार मिळू शकतात?
निर्धन पात्र लाभार्थी रुग्ण
ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन्न रु. ८५ हजार इतकं आहे, त्यांना १० टक्के राखीव खाटा १०० टक्के मोफत उपचाराकरीता आरक्षित ठेवणं बंधनकारक आहे.
दुर्बल घटकांतील लाभार्थी रुग्ण
ज्या रुग्णाचं वार्षिक उत्पन्न रु. १,६०,०००/- इतकं आहे, त्यांना १० टक्के राखीव खाटा ५० टक्के सवलतीच्या दरात उपचाराकरता आरक्षित ठेवणं बंधनकारक आहे.