26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी दहशदवादी तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. तहव्वुर राणा गेल्या काही काळापासून अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील तुरुंगात बंद होता. भारत दीर्घकाळापासून अमेरिकेकडे त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होता. अमेरिकेने आता ही मागणी पूर्ण केली असून त्याला भारतात आणण्यात आले आहे.
तहव्वुर राणाला भारतात आणल्यानंतर मात्र पाकिस्तानने बचावात्मक भूमिका घेत तहव्वुर राणाचा आता पाकीस्तानशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानने एक निवेदन सादर करत म्हंटले आहे की, ‘तहव्युर राणा याने गेल्या दोन दशकांत त्याच्या पाकिस्तानी कागदपत्रांमध्ये सुधारणा केली आहे. त्याची कॅनेडियन राष्ट्रीयत्व अगदी स्पष्ट आहे,”
तहव्वुर राणाला भारतात आणल्यानंतर आता त्याची चौकशी केली जाईल. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात आणखी कोण-कोण होत? हल्ल्याचा प्लॅन कोणाचा होता? तसेच पाकिस्तानची भूमिका काय होती? असे अनेक प्रश्न विचारले जातील. या चौकशीत नवनवीन खुलासे होऊ शकतात. याच भीतीने पाकिस्तानचा आणि त्याचा आता काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.
खरं तर तहव्वुर राणा हा पाकिस्तानी लष्कराचा, आयएसआयचा एक अंतर्गत सदस्य आहे. दहशतवादी राणा आता मुंबई २६/११ हल्ल्याच्या कटात पाकिस्तानची थेट भूमिका उघड करेल. या भिंतीने पाकिस्तानने आधीच काढता पाय घेतला आहे.
कोण आहे तहव्वूर राणा?
तहव्वूर हुसेन राणा हा एक पाकिस्तानी-कॅनडियन दहशतवादी, व्यापारी आणि माजी लष्करी डॉक्टर आहे. जो दहशतवादाशी संबंधित कारवायांमध्ये त्याच्या सहभागासाठी प्रसिद्ध आहे. 2008 च्या मुंबई हल्ल्यात देखील त्याचा हात होता असं बोललं जात आहे.
तसेच 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेविड कॉलमेन हेडलीशी त्याचा संबंध असल्याचे मानले जाते आहे.