ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा जुहू तारा रोड येथे असलेला आजिवसन गुरुकुल संकुलाचा भूखंड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी सरकारने दिलेल्या भूखंडाचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केला आहे.
सरकारने दिलेल्या भूखंडाचा वापर गुरुकुल अकादमी उभारण्यासोबतच निवासी कामासाठी विनापरवाना वापरला असल्याची माहिती उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सरकारकडे योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली गेली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? सविस्तर जाणून घेऊया…
28 मे 1986 मध्ये सुरेश वाडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने एक संस्था उघडण्यासाठी भूखंडाची विनंती केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्जाची पडताळणी केल्यावर 8260 चौ. फुटांचा भूखंड क्रमांक 3 वाडकर यांच्या संस्थेला देण्याचा निर्णय 10 मे, 1988 रोजी घेतला. त्यानंतर वाडकर यांनी त्याच्या बाजूचा भूखंड मिळवण्यासाठी विनंती केल्यावर त्यांना दुसरा भूखंड 9 एप्रिल 2003 रोजी देण्यात आला. सरकराकडून प्रदान करण्यात आलेल्या या भूखंडावर संस्थेने दोन इमारती उभारल्या आहेत. मात्र, या जागेचा वापर मूळ हेतूबाह्य झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
सरकराने दिलेल्या या जागेवर गुरुकुल सोबतच बिलबाँग हाय इंटरनॅशन स्कूल सुरू करण्यात आले आहे. तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालानुसार, याची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता संस्थेने या शाळेसोबत 2006 पासून भाडेकरारनामा केल्याचं निदर्शनास आलं आहे. सबब ट्रस्टने मूळ जमीन प्रदान आदेशातील अटी व शर्तींचा भंग केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. त्यामुळे शर्तभंगाच्या अनुषंगाने शासन स्तरावरून यावर योग्य ती करवाई व्हावी अशी विनंती उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी केली केली आहे.