Namdev Dhasal: मुंबईतील ऐतिहासिक आणि आता पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामाठी पुरा भागाला लवकरच ‘नामदेव ढसाळ नगर’ असे नाव देण्यात येणार आहे,अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ११ एप्रिल रोजी केली आहे. दलित साहित्याचे आधारस्तंभ आणि प्रसिद्ध कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे यावेळी शेलार यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले, “कामाठी पुरा हा मुंबईच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या भागाचा पुनर्विकास करताना येथील सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जतन करणे आवश्यक आहे. नामदेव ढसाळ यांनी आपल्या लेखणीतून आणि कृतीतून समाजातील उपेक्षित घटकांना आवाज दिला. त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात प्रेरणादायी आहे. त्यामुळे पुनर्विकसित कामाठी पुराला ‘नामदेव ढसाळ नगर’ असे नाव देऊन त्यांच्या स्मृतीला चिरस्थायी ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
या निर्णयामुळे दलित साहित्य चळवळीतील कार्यकर्ते, नामदेव ढसाळ यांचे अनुयायी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या घोषणेचे स्वागत केले असून, हा निर्णय योग्य आणि प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे कामाठी पुराला भागाला सुद्धा एक नवी ओळख मिळेल आणि नामदेव ढसाळ यांच्या योगदानाला कायमस्वरूपी स्थान प्राप्त होईल, असे मानले जात आहे.
दरम्यान, कामाठी पुरा हा मध्य मुंबईतील एक दाटीवाटीचा आणि ऐतिहासिक भाग आहे. आता या भागाच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू होणार आहे. पुनर्विकास करताना येथील मूळ रहिवाशांचे हित जपले जाईल, तसेच आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे ‘नामदेव ढसाळ नगर’ साकारले जाईल, असे आश्वासन मंत्री शेलार यांनी दिले आहे. या नामकरण प्रक्रियेत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित शासकीय विभाग यांच्याशी चर्चा करून आवश्यक त्या औपचारिकता पूर्ण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरच यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात येईल, अशी माहितीही शेलार यांनी दिली आहे.