Laxman Hake: महात्मा फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी स्त्री शिक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली होती, आणि महात्मा फुलेंनी त्यांचे अनुकरण केले, असे वक्तव्य उदयराजे यांनी केले होते. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, उदयनराजे यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे.
उदयनराजे यांनी आपल्या राजवाड्यातून स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली असल्याचा दावा केला. त्यांचे म्हणणे आहे की, प्रतापसिंह महाराज यांच्याच संस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण झाले. मात्र, या वक्तव्याला ऐतिहासिक पुरावे नसल्याचा दावा करत हाके यांनी उदयनराजेंच्या वक्तव्यावर आक्रमक टीका केली आहे.
लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील जनतेचे आणि ‘छत्रपती’ या शब्दाचे अतूट नाते आहे. मात्र, कोणताही अभ्यास न करता, इतिहासकारांचा सल्ला न घेता अशा प्रकारची विधाने करणे एका खासदाराला शोभत नाही. महात्मा फुले यांची जयंती असताना अशा प्रकारचे वक्तव्य करून त्यांचा अपमान झाला आहे.”
पुढे बोलताना हाके म्हणाले, उदयनराजेंनी आधी ‘वाघ्या कुत्र्याची समाधी उखडा’ असेही वक्तव्ये उदयनराजेंनी केले आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा सातबारा मिळालाय का? तुम्ही मुख्यमंत्री आहात का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वेगळा न्याय तुम्हाला आणि वेगळा न्याय आम्हाला का, असा संतप्त सवालही हाकेंनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात महापुरूषांबद्दल आक्षेपाहार्य वक्तव्य करणे, हा जणू ट्रेंडच बनला आहे. सध्या महापुरूषांचे विचार जनतेच्या मनामध्ये रूजवण्याची गरज असताना राजकारणी मंडळीच महापुरूषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगताना दिसत नाही. यामुळे सामाजिक वातावरण बिघडते याचेही भान या राजकीय मंडळींना राहत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी महापुरूषांबद्दल बोलताना खोलवर अभ्यास करूनच बोलले पाहीजे. नाहीतर उद्या राजकारणी मंडळींचे अनुकरण करून कोणीही उठून महापुरूषांबद्दल काहीही बोलायला घाबरणार नाही.