Csk: 22 मार्च 2025 पासून सुरू झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स संघाची कामगिरी अपेक्षित पातळीवर नसल्याने आधीच अडचणीत असलेल्या संघाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर पडला आहे. आता एम. एस धोनीकडे पुन्हा संघ नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्सच्या संघात धोनी अद्याप अनकॅप्ड खेळाडू म्हणून सहभागी होता.
ऋतुराज गायकवाड संघामधून बाहेर पडल्यानंतर सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे की, गुवाहाटीमध्ये झालेल्या सामन्यात ऋतुराजच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती. सुरुवातीला केवळ एक्स-रे करण्यात आला, मात्र त्यात काही स्पष्ट न झाल्यामुळे एमआरआय स्कॅन करण्यात आला. त्यामध्ये फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले आणि त्यामुळे ऋतुराज हंगामातून बाहेर पडला आहे. संघासाठी त्याने ज्या प्रकारे प्रयत्न केले त्याबद्दल स्टीफन फ्लेमिंग यांनी त्याचे कौतुकही केले.
आता ऋतुराजच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या फलंदाजी क्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. संघाला आता प्लेइंग 11 मध्ये महत्त्वाचे बदल करावे लागतील. आयपीएल 2025 मध्ये चेन्नईने आतापर्यंत 5 पैकी 4 सामने गमावले असून सध्या ते पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहेत. अशा परिस्थितीत कर्णधार बदलाच्या निर्णयानंतर सीएसके पुन्हा फॉर्ममध्ये येईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.