कर्नाटक मधील यादगीर जिल्ह्यातील मल्हार गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) एक गंमतीदार पण गंभीर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या योजनेतून मजुरी मिळवण्यासाठी काही पुरुषांनी महिलांच्या साड्या नेसून फोटो काढले आणि ते महिला असल्याचे भासवले. हे फोटो फेब्रुवारी महिन्यात नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सर्व्हिस (NMMS) वर अपलोड करण्यात आले. या फोटोंमध्ये पुरुष स्त्रीवेशात कालवा खोदण्याच्या ठिकाणी उभे असल्याचे दिसत होते.
खरं तर, या जागी महिला काम करत असल्याचे दाखवण्यात आले होते. पण प्रत्यक्षात तिथे पुरुषांनी काम केले आणि सरकारकडून सुमारे ३ लाख रुपयांचा बेकायदेशीर फायदा घेतला. या प्रकारामुळे खरी महिला कामगार कामापासून वंचित राहिल्या. सरकारची दिशाभूल करून फसवणूक करण्यात आली. गावाचे पंचायत विकास अधिकारी चेन्नाबासवा यांनी सांगितले की, “या घोटाळ्यात माझा काही संबंध नाही. हे काम एका आउटसोर्स कर्मचाऱ्याने केलं असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. आता गावात मनरेगाचे काम नीट सुरू आहे आणि सध्या २,५०० लोकांना काम मिळालं आहे.” जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
मनरेगा योजना काय आहे ?
मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) ही केंद्र सरकारची योजना आहे.
या योजनेत ग्रामीण भागातील लोकांना दरवर्षी १०० दिवस रोजगार मिळतो.
या योजनेचा उद्देश म्हणजे गावातल्या लोकांना स्थानिक कामांमध्ये रोजगार देणे, विशेषतः गोरगरीब आणि गरजू लोकांना मदत करणे.मजुरीसाठीचा निधी पूर्णपणे केंद्र सरकारकडून दिला जातो , तर साहित्याच्या खर्चाच्या ७५% केंद्राकडून आणि उर्वरित २५% राज्याकडून दिला जातो.
वस्तूतः अशा कृत्यामागे काही वेळा पंचायत पातळीवरील अधिकारी किंवा आउटसोर्स कर्मचारी यांची संमती/मदत असते किंवा त्यांना या गोष्टीबद्दल काहीच माहिती नसते, त्यामुळे फसवणुकीला वाव मिळतो. तसेच ग्रामीण भागात रोजगाराच्या कमी संधी असतात. त्यामुळे काही जण थोड्या पैशांसाठी फसवणुकीचे मार्ग पत्करतात. मात्र अशा प्रकारांमुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या कामावर गदा येते. यामुळे कर्नाटकातील सिद्धारमैया सरकारने याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे