Amit shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडाला भेट देऊन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. त्यांनी महाराजांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते.
अमित शहा यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, नेतृत्वाचे आणि स्वराज्याच्या स्थापनेतील योगदानाला त्रिवार वंदन केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक महान योद्धा नव्हते, तर ते एक दूरदृष्टीचे शासक आणि प्रजाहितदक्ष राजा होते. त्यांनी आपल्या कुशल प्रशासनाने आणि पराक्रमाने एका शक्तिशाली स्वराज्याची निर्मिती केली, जी पिढ्यानपिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहे.”
यावेळी अमित शहांनी रायगडाला प्रेरणास्थळ बनवण्याची घोषणा केली आहे. शहा म्हणाले की, “शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला ती ही जागा आहे. बालशिवाजीपासून ते छत्रपतीपर्यंतचा इतिहास या पवित्र भूमीत आहे. रायगडाला पर्यटन नव्हे तर प्रेरणास्थळ बनवण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे. सातवीपासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी आले पाहिजेत आणि त्यांनी महाराजांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे.”
रायगडावरील कार्यक्रमानंतर अमित शहांनी स्वराज्यासाठी योगदान देणाऱ्या काही प्रमुख घराण्यांच्या वारसाशी संवाद साधला आणि त्यांचा सन्मान केला. तसेच तीनही सेनादलातील काही पराक्रमी अधिकारी आणि जवानांशीही त्यांनी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले. एकंदरीत, अमित शहा यांचा आजचा रायगड दौरा छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचे स्मरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे.