Melbourne: काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या हिंदू मंदिरांची तोडफोड आणि खलिस्तान समर्थकांच्या निदर्शनांनंतर आता पुन्हा मेलबर्नमधील भारतीय वाणिज्य दूतावासात अराजकतावादी घटकांच्या कारवाया उघडकीस आल्या आहेत. मेलबर्नमधील भारतीय वाणिज्य दूतावासातील साइनबोर्डवर समाजकंटकांनी चिथावणीखोर घोषणा लिहिल्याची माहिती समोर आली आहे. पंरतु या घोषणा कोणी लिहिल्या हे मात्र आतापर्यंत कळू शकलेले नाही. यामागे खलिस्तान समर्थकांचा हात असू शकतो, असे मानले जात आहे. कारण, यापूर्वीही खलिस्तान समर्थकांनी भारतीय वाणिज्य दूतावासावर त्यांचा बेकायदेशीर ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला होता.
ऑस्ट्रेलिया टुडे या वृत्तापत्रानुसार, गुरुवारी रात्री १:०० वाजण्याच्या सुमारास दूतावासाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लाल रंगात केलेले खुणा दिसून आल्या. या घटनेनंतर, कॅनबेरा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा उपस्थित केला. याबाबत व्हिक्टोरिया पोलिसांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, आम्हाला वाटत आहे की बुधवार आणि गुरुवारी रात्रीच्या दरम्यान कोणीतरी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर खुणा केल्या असतील. या संबंधीची चौकशी अजूनही सुरू आहे.
परंतु पोलिसांनी पोलिसांनी अद्याप कोणत्याही संशयितांची ओळख पटली आहे की नाही हे सांगितलेले नाही. त्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, जर कोणाकडे या घटनेबाबत काही माहिती असेल तर त्यांनी पुढे यावे. आता दूतावासात अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यापूर्वीही, आंतरराष्ट्रीय तणावाच्या वेळी, येथील भिंतींवर प्रक्षोभक घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.
भारतीय उच्चायोगाने शुक्रवारी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये लिहिले की, ‘मेलबर्नमधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या भिंतींवर गैरकृत्य करणाऱ्यांनी केलेल्या अपमानास्पद कृत्याचा मुद्दा ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांकडे उपस्थित करण्यात आला आहे. देशातील भारतीय राजदूत आणि कर्मचाऱ्यांची तसेच वाणिज्य दूतावासाच्या इमारतींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.