Rahul Gandi: नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने या प्रकरणी मोठी कारवाई करत असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडच्या दिल्ली, मुंबई आणि लखनऊ येथील तब्बल ६६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने १२ एप्रिल रोजी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आता ईडीकडून यासंदर्भात संबंधित प्रॉपर्टी निबंधकांना आवश्यक कागदपत्रे पाठवण्यात आली आहेत. तसेच, दिल्लीतील हेराल्ड हाऊस, मुंबईतील वांद्रे येथील मालमत्ता आणि लखनऊ येथील एजेएलच्या इमारतीवर नोटिसा लावण्यात आल्या आहेत. या नोटिसांमध्ये मालमत्ता खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील हेराल्ड हाऊसच्या काही मजल्यांवर असलेल्या कंपनीला आतापासून भाडे ईडीच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बहुतांश समभागधारक आहेत. यंग इंडियाने कथितरित्या एजेएल आणि तिच्या मालमत्ता केवळ ५० लाख रुपयांना विकत घेतल्याचा आरोप आहे, तर या मालमत्तांची किंमत सुमारे दोन हजार कोटी रुपये असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी मनी लाँड्रिंग कायद्यान्वये तपास करत आहे. यापूर्वी या प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही ईडीने चौकशी केली आहे.
आता ईडीने सष्ट केले आहे की, ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ आणि नियमांच्या अंतर्गत करण्यात आली आहे. या कायद्यानुसार, ज्या मालमत्ता गुन्ह्याच्या माध्यमातून मिळवलेल्या पैशातून खरेदी केल्या गेल्या आहेत, त्या जप्त करण्याची तरतूद आहे. ईडीने यापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या, ज्याला आता निर्णायक मंजुरी मिळाली आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, यंग इंडिया आणि एजेएलच्या मालमत्तांचा वापर कथितरित्या १८ कोटी रुपयांचे बनावट देणग्या, ३८ कोटी रुपयांचे बनावट भाडे आणि २९ कोटी रुपयांच्या बनावट जाहिरातींच्या माध्यमातून गुन्ह्याची रक्कम जमा करण्यासाठी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात एकूण ९८८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.
परंतु काँग्रेसने मात्र या कारवाईला राजकीय सूडबुद्धीचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, ईडीने कायद्यानुसारच कारवाई करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.