Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १२ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडाला भेट देऊन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. त्यांनी महाराजांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते.
दरम्यान,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या.
अमित शहांनी रायगडावरील भाषणात महाराजांच्या शौर्याचे स्मरण केले:
रायगडावर आयोजित कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, नेतृत्वाचे आणि स्वराज्यातील योगदानाला नमन केले. त्यांनी महाराजांना केवळ एक महान योद्धाच नव्हे, तर दूरदृष्टीचे शासक आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून गौरवले. महाराजांचे विचार आणि आदर्श आजही आधुनिक भारतासाठी प्रेरणास्रोत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वराज्यासाठी योगदान देणाऱ्या घराण्यांचा सन्मान:
रायगडावरील कार्यक्रमानंतर अमित शहांनी स्वराज्यासाठी योगदान देणाऱ्या काही प्रमुख घराण्यांच्या वारसाशी संवाद साधला आणि त्यांचा सन्मान केला. तसेच तीनही सेनादलातील काही पराक्रमी अधिकारी आणि जवानांशीही त्यांनी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढवले.
विकासकामांचा आढावा:
रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांची माहिती अमित शहा यांनी घेतली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले.
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीला उपस्थित राहण्याचे अमित शहांनी पडळकरांना दिले वचन:
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची पुण्यात भेट घेतली. मे महिन्यात अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण पडळकर यांनी अमित शाह यांना यावेळी दिले आहे. तर अमित शाह यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे वचन दिले आहे
सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भोजन आणि राजकीय चर्चा:
दुपारच्या सुमारास अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या रोह्यातील निवासस्थानी भोजनासाठी गेले होते. या भेटीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. या राजकीय भेटीत महायुतीच्या नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आहे. मात्र नेमक्या काय चर्चा झाल्या हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
अमित शहा मुंबईतील चित्रलेखा मासिकाच्या कार्यक्रमात सहभागी:
सायंकाळी अमित शहा मुंबईमध्ये ‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकाच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. येथे त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवर आणि गुजराती साहित्य क्षेत्रातील योगदानाला गौरवले.
अमित शहा यांचा हा दौरा राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांनी एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहून राज्याच्या ऐतिहासिक वारसाचा सन्मान केला, तर दुसरीकडे महायुतीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून राजकीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला.