Ajit Pawar: बिग बॉस मराठी’मुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या सूरज चव्हाणने (Suraj Chavan )निवडणुकीच्या दरम्यान अजित पवारांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सूरज चव्हाणला नवीन घर बांधून देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे अजित पवार आणि सुरज चव्हाणचे संबंध जवळचे आहेत, असे म्हटले जाते . त्यातच आज म्हणजेच १३ एप्रिल रोजी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील सूरज चव्हाणच्या घरी अचानक भेट दिली आहे.
अजित पवार यांच्या भेटीमुळे सूरज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखद धक्का बसला होता. विशेष म्हणजे अजित पवारांनी सूरज चव्हाणच्या घरी काही वेळ घालवला आणि त्याची आणि त्याच्या कुटुंबाच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच, पवारांनी सूरज चव्हाणच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी आणि भविष्यातील नियोजनांविषयी माहिती घेतली.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1911292894146961460
दरम्यान, 25 एप्रिल रोजी सुरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’ सिनेमा रिलीज होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सूरज चव्हाणच्या ‘झपूक झुपुक’ या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण केले आणि त्याला या नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अजित पवार म्हणाले, “सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात आपल्या साध्या आणि मनमोकळ्या स्वभावाने लोकांची मने जिंकली. आता तो चित्रपटामध्ये पदार्पण करत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. त्याने या क्षेत्रातही उत्तम यश मिळवावे, यासाठी माझ्या शुभेच्छा.”
यावेळी अजित पवारांनी सूरजच्या नव्या घराच्या बांधकामाची देखील तपासणी केली. विशेष म्हणजे हे घर अजित पवार सूरजला भेट देत आहेत. त्यामुळे कामात कुठेही कसूर राहता कामा नये, कामाची गुणवत्ता चांगलीच असली पाहिजे, अशा सूचना पवार यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, आता या भेटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अजित पवार सूरज आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. खरेतर अजित पवार यांचा दौरा आज त्यांच्या मतदारसंघातील ग्रामीण भागात होता. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी सूरज चव्हाणच्या घराच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्याचा आढावा घेतला.