कोलंबिया विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थ्याला पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल अमेरिकेतून हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेतील लुईझियानाच्या एका इमिग्रेशन न्यायाधीशांनी हा निर्णय दिला आहे.
लुईझियानाच्या इमिग्रेशन न्यायाधीशाने शुक्रवारी हा निर्णय दिला आहे. महमूद खलीलवर कोलंबिया विद्यापीठ कॅम्पसमध्ये पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी होत राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा आरोप आहे.
इमिग्रेशन न्यायाधीश जेमी ई. कॉमन्स म्हणाले की, ‘अमेरिकन सरकारने स्पष्ट आणि खात्रीशीर पुरावे दिले आहेत की खलीलच्या देशात उपस्थितीमुळे परराष्ट्र धोरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. जे त्याला देशातून हद्दपार करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.’
मात्र, खलीलच्या वकिलांनी न्यायालयाच्या या निर्णयावर टीका केली आहे. हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. सुनावणी ही योग्य प्रक्रियेचा आधारस्तंभ आहे आणि मतभेद दाबण्यासाठी इमिग्रेशन कायद्याचा वापर केला जात असल्याचे उदाहरण त्याच्या वकिलांनी न्यायालयात दिले आहे.
पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल खलीलला ८ मार्च रोजी इमिग्रेशन एजंट्सनी अटक केले होते. त्यानंतर आता त्याला हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खलील सध्या इमिग्रेशन डिटेन्शन सेंटरमध्ये आहे. महमूद खलील याची अटक ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलविरोधी निदर्शनांमध्ये सामील झालेल्या आणि गाझामधील युद्धाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या पॅलेस्टिनी कार्यकर्त्यांवर आणि विद्यार्थ्यांवर केलेल्या व्यापक कारवाईचा एक भाग होती.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी खलीलच्या हद्दपारीला पाठिंबा देणाऱ्या कायद्याचा हवाला देत म्हटले आहे की, ‘हा कायदा त्यांना अशा लोकांना काढून टाकण्याचा अधिकार देतो जे अमेरिकेसाठी धोकादायक ठरू शकतात.’
महमूद खलील कोण आहे?
महमूद खलील हा कोलंबिया यू अपार्टाइड डायव्हेस्ट (CUAD) च्या नेत्यांपैकी एक आहे. हा गट गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायली लष्करी कारवाईला विरोध करतो. या गटाने बांगलादेशातील अतिरेकी विद्यार्थी चळवळीलाही पाठिंबा दिला आहे.