गुरुवारी जेव्हा २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर हुसेन राणा याला अमेरिकेतून भारतात आणण्यात आले त्यानंतर देशातील अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेक नेते मंडळी मोदी सरकाराच्या या यशाचे कौतुक करताना दिसले तर दुसरीकडे मात्र, विरोधक याचे श्रेय स्वतःला देताना दिसले.
नुकतीच माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणावर प्रतिक्रिया देत मोठा दावा केला आहे. चिदंबरम यांनी तहव्वुर हुसेन राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया आमच्या सरकारच्या काळात सुरू झाली होती असा दावा केला आहे. 2014 नंतर जेव्हा मोदी सरकार आले तेव्हा त्यांनी आम्ही रचलेला पाय फक्त पुढे नेला आहे असं म्हंटल आहे.
खरं तर यूपीए (संयुक्त प्रगतिशील गठबंधन) सरकारच्या काळात देशात जेव्हा दहशतवाद्यांचे तांडव सुरू होते तेव्हा सरकार दहशदवाद्यांना नव्हे तर भाजपाचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष करत होते. हे सगळ्यांना माहितीच आहे. चिदंबरम यांनी २६/११ च्या षडयंत्राचा उलगडा करेल असा एक अत्यंत महत्वाचा पुरावा स्वत: नष्ट केला होता. दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया आमच्या सरकारच्या काळात सुरू झाली होती, असा दावा चिदंबरम केला असला तरी अमेरिकी न्यायालयाने २०११ मध्ये २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणातून राणाला निर्दोष ठरवल्यानंतर यूपीए सरकारला जाग आली होती. आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकेकडे तहव्वूर राणाचे हस्तांतरण करण्याची मागणी केली होती. कारण त्यावेळी सरकारकडे कोणताही पर्याय नव्हता. सगळीकडे एकच चर्चा सुरु होती. म्हणून त्यांना राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी करावी लागली.
दरम्यान, चिदंबरम हे तहव्वुरच्या अटकेचे श्रेय घ्यायला पुढे आल्याचे पाहायला मिळाले पण २६/११ च्या हल्ल्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न आता त्यांना विचारला जात आहे.