Phule Movie: राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला ‘फुले’ हा चित्रपट 11 एप्रिल 2025 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. परंतु राज्यातल्या ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता नव्या तारखेनुसार चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
आता चित्रपटावरून सुरू असलेल्या गोंधळावर चित्रपटात महात्मा फुलेंची भूमिका साकरणारा अभिनेता प्रतीक गांधीने प्रतिक्रिया दिली आहे की, मी एका ठिकाणी शूटिंग करतो होतो, तेव्हा मला समजले की चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावेळी मला खूप दु:ख झाले. कारण ११ एप्रिल ही तारीख चित्रपटाच्या अनुषंगाने खूप विशेष तारीख होती. कारण, त्या दिवशी महात्मा फुले यांची १९७ वी जयंती होती. जर चित्रपट त्या दिवशी रिलीज झाला असता तर तो इतिहासाचा भाग झाला असता. पण ठिक आहे, जे होते ते चांगल्यासाठीच होते.
निर्मात्यांना चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. मात्र चित्रपटातला मूळ संदेश पुसला गेलेला नाही. काही लोकांनी ट्रेलरवरुनच आक्षेप घेतला आहे. त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी संपूर्ण चित्रपट पाहून मगच मत नोंदवावे. ट्रेलरमध्ये पाहून संदर्भ लागत नाही, असेही प्रतिक गांधी म्हणाले आहे.
दरम्यान, चित्रपटावरून वाद वाढल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना अनेक बदल करण्याचे आदेशही दिले आहेत. विशेष करून जातिव्यवस्थेचा उल्लेख करणारा व्हॉइसओव्हर काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटातून महार, मांग, पेशवाई आणि मनुस्मृती जातिव्यवस्था हे शब्द काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.