पुण्यातील स्वारगेट प्रकरणानंतर महिलांच्या एसटी प्रवासात सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे आता एसटी महामंडळाने महिलांच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता प्रत्येक एसटी बसमध्ये ‘पॅनिक बटण’ लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन बसस्थानकांमध्ये आणि येणाऱ्या नव्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. सुरक्षा रक्षकांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. याबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बसस्थानकांचे आधुनिकरण करून प्रवाशांना चांगल्या सुविधा दिल्या जातील.
‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ तत्त्वावर विकास
राज्यात एसटी महामंडळाकडे सध्या ८४२ ठिकाणी १,३६० हेक्टर जमीन आहे. ही जमीन शहरी, निमशहरी व ग्रामीण भागात विभागली आहे. या जमिनीवर ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या पद्धतीने खासगी भागीदारीतून एसटी स्थानकं आणि आगारे विकसित केली जातील.पहिल्या टप्प्यात ६६ जागांची निविदा लवकरच काढण्यात येणार असून विकासकाने शहरी, तालुका आणि ग्रामीण अशा तीन ठिकाणच्या जागा विकसित करायच्या आहेत.त्यामुळे एसटीच्या अविकसित जागाही चांगल्या विकासकाकडून विकसित होतील.
राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी काही चांगले निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ केली जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार वेळेवर पगार
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी बोलताना सरनाईक म्हणाले की,सध्या आर्थिक अडचणींमुळे मार्च महिन्यात फक्त ५६% पगार देण्यात आला. पण आता दर महिन्याच्या ७ तारखेला सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होईल, त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन. परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहे.
सध्या जुन्या बस भंगारात टाकून त्यांच्या जागी नवीन बस घेतल्या जात आहेत. यावर्षी २,६४० नवीन लालपरी बस एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. त्यापैकी ८०० पेक्षा जास्त बस आधीच सेवेत दाखल झाल्या आहेत. याशिवाय, ग्रामीण भागात उपयुक्त मिडी बस, तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी २०० वातानुकूलित शयनयान बस देखील येणार आहेत. गावापासून शहरापर्यंत चांगली एसटी सेवा पुरवणे या मागचा सरकारचा मुख्य उद्देश आहे. शिवाय एसटी ही राज्यातील १३ कोटी जनतेसाठी विश्वासार्ह, सुरक्षित आणि किफायतशीर वाहतूक सेवा आहे. त्यामुळे शहरांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.