Mehul Choksi:भारताच्या आर्थिक इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेतून( पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला अखेर बेल्जियम पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर आता पुन्हा एकदा हा घोटाळा चर्चेत आला आहे. 2018 मध्ये 13,500 कोटी रुपयांचा हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर चोक्सी भारतातून पळून गेला होता. भारतातून पळून गेल्यानंतर त्याने अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले होते.
चोक्सीने भारतातून पळ काढत दुसऱ्या देशात नागरिकत्व घेत भारताच्या कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय यंत्रणा त्याच्या मागे लागून होत्या. नुकतीच भारत सरकारच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी त्याला अटक केली असून सध्या भारत सरकारकडून त्याचे प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.त्याच्या प्रत्यार्पणानंतर पीएनबी घोटाळ्यातील अनेक महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय आहे
२०१८ मध्ये पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी बँकांची हजारो कोटींची फसवणूक केली होता. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघे काका-पुतणे देश सोडून पळून गेले. मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा काका आहे.
कोण आहे मेहुल चोक्सी ?
मेहुल चोक्सी हा गीतांजली समूहाचा मालक आहे. गितांजली समूह हा मेहुल चोक्सीच्या मालकीचा एक मोठा हिरे आणि आभूषण निर्मिती तसेच विक्री करणारा समूह होता. हा समूह जगातील सर्वात मोठ्या ब्राॅंडेड ज्वेलरी रिटेलर्सपैकी एक होता आणि त्याचे मुख्यालय मुंबई येथे होते. परंतु मेहुल चोक्सीने त्याचा पुतण्या नीरव मोदी याच्यासोबत मिळून त्याने 2018 मध्ये पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. झालेल्या घोटाळ्यात मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग वापरून पैसे काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर भारतातील अनेक एजन्सींनी चौकशी केली आणि ईडी व सीबीआयने त्याला वाँटेड घोषित केले होते.
दरम्यान,अटकेनंतर मेहुल चोक्सीने आपली प्रकृती खालावली असल्याचे सांगून बेल्जियम न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याचा वकील दावा करत आहे की, चोक्सी उपचारासाठी बेल्जियममध्ये आला होता आणि सध्या तो अँटवर्पमध्ये आपल्या पत्नी प्रीतीसोबत राहत होता.