राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ पर्यंत मोफत वीज देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे एका सभेला संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसाला १२ तास वीज देण्याचे आश्वासन दिले आहे व मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरू केली आहे. ज्याअंतर्गत १६,००० मेगावॅट वीज निर्मितीचे काम सुरू आहे.’
पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की डिसेंबर २०२६ च्या अखेरीस महाराष्ट्रातील सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल. आम्ही ३६५ दिवसांसाठी दिवसाचे १२ तास वीज पुरवू. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.’
दरम्यान, वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकास प्रकल्पांच्या घोषणाही केल्या आहेत. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी असा दावाही केला की राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काम करणार आहे.